विकास गोगावलेनंतर जुईली दळवींचाही उमेदवारी अर्ज, राजकीय समीकरणांमध्ये ट्विस्ट
अनिकेत तटकरे यांच्यासाठी राष्ट्रवादी आग्रही; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
शिवसेना की राष्ट्रवादी? जागेच्या दाव्यावरून महायुतीत जोरदार हालचाली
रायगड(प्रतिनिधी): कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. ही जागा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून उमेदवारीच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या जागेसाठी सुरुवातीला मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने शिवसेना ही जागा लढवणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र आता अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी-जुईकर यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतल्याने समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जुईली दळवी स्वतः शिवसैनिकांसह अर्ज दाखल करण्यासाठी गेल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पुत्र अनिकेत तटकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी महायुतीतील वरिष्ठ स्तरावर जोरदार फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, मंत्री गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासंदर्भात समझोता झाल्याच्या चर्चांमुळे शिवसेना ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र शिवसेनेतील काही नेते आणि कार्यकर्ते या भूमिकेशी सहमत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच जुईली दळवी यांची उमेदवारी पुढे करून पक्षांतर्गत दबाव वाढवण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आता महायुतीकडून अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून शेवटच्या क्षणापर्यंत या जागेवरील सस्पेन्स कायम राहण्याची चिन्हे आहेत.






