मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर जखमी


महाड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना शनिवारी (दि. ३० मे) पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील रहिवासी व कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अनिल मार्कड हे आपल्या कुटुंबासह हुंडाई क्रेटा (एमएच ०८ एएन २४३९) या वाहनातून दापोलीकडे जात होते. दुपारच्या सुमारास त्यांचे वाहन पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ परिसरात पोहोचले असता रत्नागिरीच्या दिशेने उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडकले.
धडक इतकी भीषण होती की वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातात कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी व आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू असून मृत व जखमींची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महामार्गावरील धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.