रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला तसेच तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या अलिबाग-पेण बायपास मार्गावरील सेवा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अवघ्या तीन वर्षांत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने तो अक्षरशः खड्ड्यांच्या ताब्यात गेला असून वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अलिबाग-पेण दरम्यानचा हा महत्त्वाचा मार्ग असूनही त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित महामार्ग प्राधिकरणाकडे विचारणा करण्यात आली असता, दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. “हा रस्ता आमच्या अखत्यारीत नाही,” असे उत्तर देत संबंधित विभागांकडून हात झटकले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत विविध ठिकाणी फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका हजारो नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना दररोज सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे. खड्डे चुकवताना वाहनांचे नुकसान होत आहे, तर दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांची तीव्रता लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली असून, प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
Home ताज्या बातम्या अलिबाग-पेण बायपास सेवा रस्त्याची दुरवस्था तीन वर्षांत रस्ता खड्ड्यांच्या ताब्यात; जबाबदारीवरून विभागांची...






