उद्योग, शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांना मिळणार राज्यस्तरीय व्यासपीठ; रायगडच्या अपेक्षा उंचावल्या
मुंबई(प्रतिनिधी): रायगडच्या विकासाचा आवाज आता थेट राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या राज्यातील सर्वोच्च आणि प्रभावशाली शासकीय मंडळावर( गव्हर्निंग कौन्सिल ) रायगडचे आशिष चंद्रकांत भट आणि विजय काशीराम राणे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे रायगडला राज्यस्तरावर दोन नवे ‘पॉवर कनेक्शन’ मिळाल्याची भावना व्यक्त होत असून उद्योग, शिक्षण, रोजगार, कृषी आणि स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्नांना आता अधिक प्रभावीपणे वाचा फुटण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी आणि सेवा क्षेत्राशी संबंधित धोरणांवर प्रभाव टाकणारी संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची ओळख आहे. अशा संस्थेवर रायगड जिल्ह्यातील दोन प्रतिनिधींना संधी मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न राज्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर मांडण्याचा मार्ग खुला झाला आहे.
आशिष भट हे राजकारण, समाजकारण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत असून रायगड जिल्हा शांतता समितीचे सदस्यदेखील आहेत. विविध स्तरांवरील त्यांच्या व्यापक संपर्कामुळे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांची जिल्हाभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
तर विजय राणे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. साईश शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षण, कौशल्य विकास आणि युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच सॅटर्डे क्लबचे सदस्य म्हणूनही ते विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत.
रायगड हा औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन, बंदरे, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्षमता असलेला जिल्हा मानला जातो. मात्र अनेक प्रश्न आणि विकासाच्या संधी राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडल्या जात नसल्याची भावना नेहमीच व्यक्त होत आली आहे. अशा परिस्थितीत भट आणि राणे यांची निवड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी “गाव तिथे उद्योजक” अशी प्रभावी संकल्पना राबवली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अशी संकल्पना राबवणार असल्याचा मानस आशिष भट आणि विजय राणे यांनी अधोरेखित केला.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही रायगडच्या हिताचे प्रश्न राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उद्योग, रोजगारनिर्मिती, उद्योजकता, कौशल्य विकास, शिक्षण आणि स्थानिक विकासाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य देत रायगडचा आवाज अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आशिष भट आणि विजय राणे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या निवडीमुळे रायगडच्या प्रतिनिधित्वाला नवी ताकद मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्याच्या निर्णय प्रक्रियेत रायगडचा सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी ही निवड मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






