रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील वाढता उकाडा, दमट हवामान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन न. जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक तात्पुरते बदलण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने १८ जून रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती कायम राहणार असून दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एल निनोच्या परिणामामुळे यंदा मान्सूनच्या प्रारंभी उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या उकाड्याचा त्रास होऊ नये, यासाठी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड तसेच शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळांचे वेळापत्रक बदलण्याची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने संबंधित शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक आणि अंगणवाडी सेविकांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना उष्णतेच्या झळांपासून दिलासा मिळणार असून पालकांनीही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.