खुनाच्या गुन्ह्यात प्रियकर अटकेत


अलिबाग (प्रतिनिधी) : विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी निलेश एकनाथ घासे (वय ४२, रा. नवेदर-नवगाव) याला अटक करून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
छाया जगदीश पाटील (वय ४२) यांचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. १८ जून रोजी पतीसोबत झालेल्या भांडणानंतर त्या आरोपीच्या घरी गेल्या असता दोघांमध्ये तीव्र वाद झाला. त्यातून आरोपीने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
अलिबाग सिव्हिल रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर पोलिसांच्या तपासात खुनाचा संशय बळावला. मयत महिलेचा मुलगा जय जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे संकलित केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.