रायगडच्या किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे; संशयास्पद हालचालींवर ठेवला जाणार बारकाईने नजर


अलिबाग  (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. किनारी भागातील संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाला गती देण्यात आली असून, या माध्यमातून समुद्रमार्गे होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्याची समुद्रकिनारपट्टी पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, याच किनारपट्टीचा गैरवापर करून अवैध घुसखोरी, तस्करी तसेच इतर गुन्हेगारी कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज होती. त्यासाठी विविध किनारी भाग, जेट्टी, बंदरे आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास परिसरावर लक्ष ठेवले जाणार असून, संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच स्थानिक पोलिस, सागरी सुरक्षा दल आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वय वाढण्यासही मदत होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले की, “रायगड जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे किनारी भागाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.”
या उपक्रमामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.