धोकावडे फाट्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम; मांडवा मार्गे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्गाची सूचना


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील धोकावडे फाटा येथे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मांडवा साईटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
झाड रस्त्यावर पडल्याने धोकावडे फाटा ते मांडवा या मुख्य मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असून, प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मांडवा साईटकडे जाणाऱ्या नागरिकांनी धोकावडे गावातून मार्गक्रमण करून म्हात्रे फाट्यावर बाहेर पडावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून रस्त्यावर पडलेले झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे आणि पावसामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढली असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच प्रवासाला प्राधान्य द्यावे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.