सिमेंट पावडरमुळे रस्ता निसरडा; जांभूळपाडा-जलपाडा मार्गावर २० वाहने घसरली


अलिबाग (प्रतिनिधी) : कार्लेखिंड-रेवस मार्गावरील जांभूळपाडा आणि जलपाडा दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा फटका आज वाहनचालकांना बसला. रस्त्यावर टाकण्यात आलेली सिमेंट पावडर पावसाच्या पाण्यात मिसळल्याने मार्ग अत्यंत निसरडा बनला आणि सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अपघातांची मालिका घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एसटी बस अशा एकूण २० वाहनांचा घसरून अपघात झाला. एका टेम्पोची झाडाला धडक बसली, तर एसटी बस रस्त्यालगतच्या चिखलात अडकली. अनेक दुचाकीस्वार जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही दुचाकींच्या इंधन टाक्या फुटल्या, तर टेम्पोंचे बंपर आणि एसटी बसच्या काचा तुटल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्ते बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.