पाऊस सुरू होताच वलगणीची चाहूल; अलिबाग तालुक्यातील खाड्यांमध्ये चिवणी माशांची मेजवानी


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनासोबतच समुद्रकिनारी आणि खाडीलगतच्या भागांमध्ये पारंपरिक मत्स्य व्यवसायाला पुन्हा उभारी मिळू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील विविध खाड्यांमध्ये सध्या चिवणी मोठ्या प्रमाणात आढळू लागल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी ही चिवणी म्हणजे स्थानिक मच्छीमारांसाठी आर्थिक उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
पहिल्या पावसानंतर खाड्यांच्या पात्रात आणि खाऱ्या पाण्याच्या प्रवाहात चिवणीची हालचाल वाढते. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील रेवस, थळ, सासवणे, नागाव, अक्षी, चौल तसेच इतर खाडीलगतच्या गावांमध्ये पहाटेपासूनच मच्छीमार जाळी आणि पारंपरिक साधनांच्या सहाय्याने चिवणी पकडण्यासाठी खाड्यांकडे धाव घेत आहेत.
चिवणीचा वापर खाद्यपदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. ताजी चिवणी बाजारात चांगल्या दराने विकली जात असल्याने मच्छीमारांना याचा आर्थिक फायदा होत आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही चिवणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, मान्सून सक्रिय होत असल्याने पुढील काही दिवसांत चिवणीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता मत्स्य व्यवसायाशी संबंधित जाणकारांनी व्यक्त केली आहे. पावसाच्या आगमनाने शेतीबरोबरच मत्स्य व्यवसायालाही चालना मिळाल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या सरी आणि खाड्यांमधील चिवणीची वलगण यामुळे अलिबाग तालुक्यात सध्या पारंपरिक मत्स्य संस्कृतीचे मनोहारी चित्र पाहायला मिळत आहे.