अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात मंजूर असलेल्या एक हजार ९८९ पोलिस पाटील पदांपैकी तब्बल एक हजार १२१ पदे रिक्त असल्याने कार्यरत पोलिस पाटलांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे तातडीने भरावीत, मानधन नियमितपणे द्यावे तसेच २०११ ते २०१६ या कालावधीतील थकीत प्रवास भत्ता अदा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील दोन हजार ११८ महसुली गावांसाठी सध्या केवळ ८६८ पोलिस पाटील कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक पोलिस पाटलांकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीविषयक माहिती संकलित करणे, विविध शासकीय अहवाल सादर करणे आणि प्रशासकीय कामकाज प्रभावीपणे पार पाडणे अधिक कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील प्रशासनावरही परिणाम होत असून, पोलिस पाटील यंत्रणेची कार्यक्षमता कमी होत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राज्य सहसचिव कुणाल लोंढे, नरेश म्हात्रे, विकास पाटील, विजय खुटले, सुशील म्हात्रे, अतुल घरत, संकेत कोतवाल, यशवंत जंगम आणि नारायण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.






