अलिबाग (प्रतिनिधी): नागाव परिसरातील धोकादायक बनलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केला आहे. गेली दोन वर्षे या पुलाच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सरपंच हर्षदा मयेकर यांनी सांगितले की, पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी आणून पुलाची धोकादायक परिस्थिती दाखवून देण्यात आली. मात्र, यानंतरही दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
पावसाळ्यात पुलावरील धोका अधिक वाढत असून, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे तातडीने पुलाची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच हर्षदा मयेकर यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “गेली दोन वर्षे या पुलाच्या दुरुस्तीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अधिकाऱ्यांना वेळोवेळी येथे आणून पुलाची परिस्थिती दाखवली आहे. मात्र त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
ग्रामस्थांनीही पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली असून, प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.




