अलिबाग (विशेष प्रतिनिधी): ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने ‘एकता इंटरप्रायझेस मुंबई’ आणि ‘कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे शाळेमध्ये एक मुख्य कार्यक्रम घेऊन एकूण ८० तर चिखली येथे २१ असे एकूण १०१ विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ‘एकता इंटरप्रायझेस’च्या संचालिका एकता म्हात्रे व निखिलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा मोलाचा मदतीचा हात देण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, केंद्र शाळा बापळे फणसापूर अंतर्गत येणाऱ्या बापळे फणसापूर, रामराज, उमटे, मोरोंडे, महान, खैरवाडी, जांभूळवाडी, गंगेचीवाडी आणि बारशेत या आजूबाजूच्या शाळांतील आदिवासी बहुल विभागातील ८० विद्यार्थ्यांना येथे एकत्र आणून साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबतच, रा. जि. प. च्या चिखली शाळेतील २१ विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र प्रमुख श्री. प्रमोद भोपी यांनी ग्रामीण भागातील विशिष्ट आदिवासी बहुभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयीची आवड आणि प्रोत्साहन निर्माण केल्याबद्दल एकता म्हात्रे व निखिलेश म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे कलारंग संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी एकता इंटरप्राईजेसचे आभार मानत, शालेय विद्यार्थ्यांना अन्य उपक्रमांच्या माध्यमातून कसा बौद्धिक विकास करता येऊ शकेल याकरिता आगामी काळात विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. तर एकता इंटरप्रायझेसच्या संचालिका एकता म्हात्रे यांनी भविष्यात या शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक बाबीची आवश्यकता भासली, तर ती उपलब्ध करून देण्याची संपूर्ण तयारी आपल्या मनोगतातून दर्शवली.
या प्रसंगी शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सिकलसेल विषयी समुपदेशन आणि तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील सिकल सेल समुपदेशक प्रतिम सुतार आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलेश भंडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना सिकलसेल व थॅलेसेमिया या आजारांविषयी मार्गदर्शन केले व उपस्थितांची सोल्यूबिलीटी तपासणी केली.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कलारंग संस्थेचे शेखर झावरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. गायकर तसेच सर्व शाळांचे शिक्षकवृंद सचिन मुंडे, शिवशरण पाटील, राजेश शेळके, श्रेया रसाळ, कावेरी चव्हाण, संजय ब्राह्मण, प्रसाद पाटील आणि मोहन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित पालकवर्गांने कौतुक केले.




