रेड अलर्ट, सततचा पाऊस आणि संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन निर्णय; शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मात्र कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने ५ ते ७ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात १ जुलैपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर, दरड कोसळण्याचा आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ७ जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची शिफारस केली होती. या अहवालांचा तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही आवश्यक तेवढ्याच कारणासाठी घराबाहेर पडण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याचे तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






