अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना “महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा” अशी उपाधी दिली. सत्ता नसतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, दबावापुढे कधीही न झुकणारे आणि सहकार, शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व म्हणून त्यांनी जयंत पाटील यांचा गौरव केला.
उत्तरादाखल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाची सर्वात मोठी भेट म्हणजे “विचारांशी एकनिष्ठ राहा” असा संदेश दिला. सत्ता आणि पदे येतात-जातात, मात्र गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी कायम ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचवून बूथस्तरावर संघटना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत त्यांनी आगामी विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकांत पक्षाच्या विचारांचा विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्याच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे विकासाला खीळ बसल्याची टीका करत युवकांनी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात उभे राहावे आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.






