अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पाल्हे पुलावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील बंदीचे पुन्हा उल्लंघन झाल्याची घटना मंगळवारी घडली. जेएसडब्ल्यू कंपनीचा एमएच 46 सीयू 2873 क्रमांकाचा रेडीमिक्सर ट्रक पुलासमोरील लोखंडी बॅरिअर्सला धडक देत ते तोडून पुढे गेल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर अलिबाग-आक्षी मार्गावरील बेली पूल आणि सहाण बायपासवरील पाल्हे पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वर्षभरापूर्वीच या पुलांवरून जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालणारे आदेश जारी केले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिअर्स आणि इशारा फलक उभारले आहेत.
पाल्हे पुलावर १६ टनांपर्यंत, तर बेली पुलावर ५ टनांपर्यंतच्या वाहनांनाच परवानगी आहे. मात्र, वारंवार होत असलेल्या नियमभंगामुळे पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित ट्रक चालक व जबाबदारांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच वाहतूकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






