पनवेल-जेएनपीटी मार्गावर चक्क यमाचा फेरा ?धावत्या कारवर कोसळला लोखंडी खांब


नवी मुंबई (प्रतिनिधी): पनवेल-जेएनपीटी मार्गावर चक्क यमच फिरत असल्याचे बोलले जातेय. या मार्गावर अनेक अपघात होऊन शेकडो स्थानिकांचे बळी गेले आहेत. त्याबाबत उपाययोजनांची मागणी होत असतानाच आता वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने येथील प्रवास जीवावर बेतत आहे. या मार्गावर एका धावत्या इनोव्हा कारवर लोखंडी बॅरिकेडचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. हा केवळ अपघात नसून पनवेल-जेएनपीटी मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे भीषण वास्तव असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत बदलापूर येथील अनिल अधिकारी यांच्या कारवर क्रेनचा लोखंडी भाग कोसळला. सुदैवाने ते या भीषण अपघातातून काही सेकंदाच्या अवधीने थोडक्यात बचावले. मात्र, या घटनेने या मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतोय.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जात असल्याचा दावा केला जातो, पण सुरक्षेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. सामान्य नागरिक प्रामाणिकपणे टोल भरतो. बदल्यात त्याला सुरक्षित प्रवास मिळायला हवा. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डे, अपूर्ण कामे, असुरक्षित बॅरिकेड्स आणि निष्काळजीपणामुळे मृत्यूचे सापळे उभे राहत असल्याची भावना वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

दरवेळी अशा दुर्घटनांनंतर चौकशीचे आदेश दिले जातात, कारणे शोधली जातात आणि काही दिवसांनी प्रकरण थंडावते. मात्र, या घटनेला जबाबदार नेमके कोण… संबंधित कंत्राटदार, कामावर देखरेख करणारे अधिकारी की संपूर्ण यंत्रणा ? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि या मार्गावरील सुरू असलेल्या कामांची तातडीने सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून जोर धरत आहे.