महायुतीत अर्थखात्यावरून रस्सीखेच; शरद पवार गटाच्या सत्ताप्रवेशाच्या चर्चांना उधाण


मुंबई (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्यावरून मोठी राजकीय रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला हे खाते पुन्हा मिळावे, अशी मागणी असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादीला अर्थखाते देण्याच्या भूमिकेत नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महायुती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य समीकरणात अर्थखाते शरद पवार गटाकडे जाऊ शकते आणि दोन वेळा अर्थमंत्री राहिलेले जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शिंदे यांचा राष्ट्रवादीला अर्थखाते देण्याबाबतचा विरोध काहीसा मवाळ झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौराही रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर शरद पवार गटाच्या सत्ताप्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. आमदार रवी राणा यांनीही पुढील पंधरा दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असा दावा केला आहे.
मात्र या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका घेत विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे शरद पवार यांचा गट स्वतंत्र ओळख कायम ठेवत महायुती सरकारला पाठिंबा देऊ शकतो, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अर्थखाते शरद पवार गटाकडे जाऊ नये, यासाठी महायुतीतील काही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. मात्र या सर्व भेटी केवळ मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात असल्याचे संबंधित नेत्यांकडून सांगितले जात आहे.
सध्या या सर्व घडामोडींवर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार, अर्थखात्याची जबाबदारी आणि शरद पवार गटाच्या संभाव्य सत्ताप्रवेशाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.