जंतर-मंतरवरील आंदोलनाला चित्रलेखा पाटील यांचा पाठिंबा; सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध


नवी दिल्ली (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या तथा सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा पाटील (चिऊताई) यांनी आज भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्ते अभिजित दिपके यांच्याशी सविस्तर चर्चा करून आंदोलनाच्या पार्श्वभूमी, प्रमुख मागण्या आणि पुढील दिशा याबाबत माहिती घेतली.

चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, त्या उद्याही आंदोलनात सहभागी होणार असून प्रख्यात पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्यांवर चर्चा करणार आहेत. संस्था चालक, तरुणांचे प्रतिनिधी आणि सहकाऱ्यांसमवेत त्या या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर-मंतर येथे उपस्थित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी लोकशाही मार्गाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला बळ मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहून संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण सुरू असतानाच जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविण्यात आल्याच्या घटनेवर चित्रलेखा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे त्यांनी म्हटले.

“प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबणे, आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे आणि संवाद टाळणे ही लोकशाहीची नव्हे, तर दडपशाहीची लक्षणे आहेत. लोकशाही व्यवस्थेत आंदोलनांना उत्तर पोलिसी कारवाईने नव्हे, तर संवादाच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे,” असे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांकडूनही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा व्यक्त केला जात असून, या आंदोलनाकडे देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.