अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात रायगड पोलिसांनी डायल 112 आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून नागरिकांना तातडीची मदत पुरवत प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद दिला.
पूरग्रस्त भागांतून आलेल्या प्रत्येक मदतीच्या कॉलची गंभीर दखल घेत डायल 112 नियंत्रण कक्षाने संबंधित पोलिस ठाण्यांशी तात्काळ समन्वय साधला. त्यानुसार स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत होते.
या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनीही योग्य वेळी डायल 112 सेवेचा वापर करून पोलिस प्रशासनावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे अनेक ठिकाणी त्वरित मदत पोहोचविणे शक्य झाल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल म्हणाल्या,“पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. डायल 112 वर आलेल्या प्रत्येक मदतीच्या कॉलला तातडीने प्रतिसाद देत संबंधित पोलिस ठाण्यांमार्फत त्वरित मदत पोहोचविण्यात आली. नागरिकांनीही योग्य वेळी आपत्कालीन सेवेचा वापर करून पोलिसांवर विश्वास दाखविला. भविष्यातही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रायगड पोलिस नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास तत्पर राहतील.”
रायगड पोलिसांनी नागरिकांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता तातडीने डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.








