
७९व्या वर्धापन दिनी २५ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती; भव्य रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन
खालापूर(प्रतिनिधी) : सत्यशोधक विचारांचा वारसा जपत शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, कामगार, विद्यार्थी, मजूर आणि भूमिहीनांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूर येथे आज अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. लाल झेंड्यांनी सजलेल्या खालापूर नगरीत रायगडसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे २५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रॅली आणि जाहीर मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हातात लाल झेंडे, डोक्यावर लाल टोप्या आणि घोषणांनी भारलेले वातावरण यामुळे खालापूरमध्ये शेकापच्या विचारांची आणि संघटनात्मक ताकदीची प्रभावी झलक पाहायला मिळाली. सकाळपासूनच विविध भागांतून कार्यकर्त्यांचे जत्थे खालापूरकडे दाखल होत होते. त्यामुळे शहर परिसराला जणू लाल रंगाची किनार लाभली होती.
शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी पक्षाने उभारलेल्या विविध लढ्यांचा आढावा घेत आगामी काळातील सामाजिक आणि राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. रायगडसह राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.
या कार्यक्रमात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पद्मश्री भिकल्या धिंडा तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शीतल गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजातील विविध घटकांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याची पक्षाची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
मेळाव्याला शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडीचे कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, वाढती महागाई, रोजगार, भूमिहीनांचे प्रश्न, सामाजिक विषमता तसेच सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आगामी काळात अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शेकापचा ७९वा वर्धापन दिन हा केवळ उत्सव न राहता आगामी राजकीय आणि सामाजिक लढ्यांची नांदी ठरेल, असा ठाम विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. २५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या विराट मेळाव्यामुळे रायगडच्या राजकीय पटलावर शेकापने आपल्या संघटनात्मक ताकदीचे पुन्हा एकदा प्रभावी प्रदर्शन घडवून आणल्याचे चित्र दिसून आले.





