रामधरणेश्वर धरणात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या युवकावर काळाचा घाला


अलिबाग(प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील मानी-वायशेत येथील रामधरणेश्वर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या एका 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 5) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहाल विजय शेट्ठी (वय 26, रा. मेटपाडा, अलिबाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. नेहाल हा आपल्या मित्रमंडळींसोबत मानी-वायशेत परिसरातील रामधरणेश्वर धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी धरणातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. तो पाण्यात उतरून पोहू लागला. मात्र, पाण्याची खोली आणि पातळीचा अचूक अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात जाऊन बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेहाल याला पाण्याबाहेर काढून तात्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे शेट्ठी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूची नोंद करून पुढील तपास व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात धरणे, तलाव आणि नदी-नाल्यांमधील पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी पोहण्याचे धाडस टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.