अलिबाग शहरात ‘नो स्मोकिंग’ जनजागृती मोहीम; शाळा, हॉटेल्ससह पर्यटनस्थळांवरही विशेष लक्ष


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला आळा घालण्यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून ‘नो स्मोकिंग’ जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, हॉटेल्स तसेच विविध आस्थापनांमध्ये धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

धूम्रपानामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक परिणाम लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करण्यासाठी कोटपा (COTPA) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकांना कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून ‘धूम्रपानमुक्त परिसर’ असल्याचे घोषणापत्र घेण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांमध्ये तंबाखू व धूम्रपानविरोधी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अलिबाग हे पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही कोटपा कायद्याच्या नियमांची माहिती देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

“अलिबाग शहर धूम्रपानमुक्त करण्यासाठी नागरिक, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था आणि विविध आस्थापनांनी नगरपालिकेला सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान टाळून निरोगी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.