वोट चोरीविरोधात काँग्रेसची अलिबाग आणि चोंढीत निदर्शने


अलिबागेत सुनील थळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; चोंढीत सम्राट ठाकूर यांचा पुढाकार

रायगडचे तिन्ही जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी दिल्लीतील महासभेला उपस्थित

अलिबाग (प्रतिनिधी): देशात कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. देशभरात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांच्या माध्यमातून काँग्रेसकडून या मुद्द्यावर आवाज उठविला जात आहे. मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करून निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातही पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. अलिबाग शहरात तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील थळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. यावेळी कथित वोट चोरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात नगरसेवक समीर ठाकूर, काका ठाकूर, माजी तालुका अध्यक्ष योगेश मगर, नयन कवळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकशाही व्यवस्थेत मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराला महत्त्व असून, मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांबाबत पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.

दरम्यान, चोंढी येथेही काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सम्राट राजेंद्र ठाकूर यांच्या पुढाकाराने निदर्शने केली. यावेळी कथित मतचोरीच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रकांचे वाटप करण्यात आले. लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

दुसरीकडे, दिल्ली येथे आयोजित महासभेला रायगड जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाध्यक्षांसह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहिले. त्यामुळे दिल्लीतील पक्षाच्या कार्यक्रमाला पाठिंबा देतानाच रायगडमध्येही स्थानिक पातळीवर आंदोलन आणि जनजागृतीच्या माध्यमातून काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे.