विलीनीकरणाची माहिती अजितदादांनी दिली होती; तटकरेंचा यु टर्न


अजित पवार हयात असते तर ……… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीचा राजकीय अर्थ काढू नका

अलिबाग (प्रतिनिधी): दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची इत्यंभूत माहिती अजित पवार यांनी आपल्याला दिली होती, असा खुलासा तटकरे यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याची भूमिका मांडणाऱ्या तटकरे यांच्या या विधानाकडे राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण यू टर्न म्हणून पाहिले जात आहे. विलीनीकरणासाठी चर्चेत असलेली १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती, असे सांगतानाच अजितदादांच्या निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया थांबल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणत्याही पातळीवर चर्चा सुरू नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीबाबत बोलताना तटकरे यांनी त्यात काहीही वावगे असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे सांगितले. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असेल; मात्र ती नेमकी कोणत्या संदर्भात झाली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीचा कुणीही राजकीय अन्वयार्थ काढू नये, असे आवाहनही तटकरे यांनी केले. एकीकडे विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचा गौप्यस्फोट, तर दुसरीकडे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबाबत सावध भूमिका, अशा दुहेरी विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या विलीनीकरणाची चर्चा नसल्याचे तटकरे सांगत असले, तरी अजितदादा हयात असते तर दोन्ही पक्ष एकत्र आले असते, या त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.