म्हाडा कॉलनीतील गटार दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू; संदीप पालकर यांच्या पाठपुराव्याला यश


नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; नगरसेविका श्वेता पालकर यांच्याकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी

अलिबाग (प्रतिनिधी) : म्हाडा कॉलनी येथील वळणावर गटाराच्या समस्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणाहून दुचाकीवरून प्रवास करणारे काही नागरिक गटाराच्या समस्येमुळे घसरून पडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक संदीप पालकर यांनी तातडीने पुढाकार घेतला.

घटनेची माहिती मिळताच संदीप पालकर यांनी नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित बांधकाम सभापती यांच्याशी त्वरित संपर्क साधला. म्हाडा कॉलनी येथील वळणावर असलेल्या गटाराची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तत्परता दाखवत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाची नगरसेविका सौ. श्वेता संदीप पालकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. दुरुस्तीचे काम दर्जेदार पद्धतीने तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करावे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.
रस्ते, गटारे आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्पर राहणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित व सुविधायुक्त परिसर उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिकता असून, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका पालकर यांनी यानिमित्ताने अधोरेखित केली.
या दुरुस्तीमुळे म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रशासनाच्या तत्परतेचे स्थानिकांकडून स्वागत होत आहे.