दिवाळी सुट्ट्या संपताच मुंबईकडे परतीचा प्रवास; मांडवा बंदर हाऊसफुल्ल, एसटीच्या नियोजनाचा बोजवारा


अलिबाग (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या सुट्ट्या संपवून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची अलिबागमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. मांडवा बंदरातून मुंबईकडे जाणारी जलवाहतूक हाऊसफुल्ल झाली असतानाच अलिबाग एसटी आगारातील नियोजनाचा अभावही समोर आला आहे. जलवाहतुकीसह एसटी बस सेवेलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह विविध भागांतील हजारो पर्यटकांनी अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात गर्दी केली होती. आता सुट्ट्या संपल्याने हे पर्यटक पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कमी वेळेत मुंबई गाठण्यासाठी अनेक प्रवाशांनी जलवाहतुकीला पसंती दिली आहे. त्यामुळे मांडवा जेट्टीवर सकाळपासूनच तिकीट खरेदीसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणाऱ्या लाँच, बोटी आणि रो-रो (एमटूएम फेरी) सेवाही प्रवाशांनी गच्च भरून धावत आहेत.

दुसरीकडे, अलिबाग एसटी आगारातही मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून एकही एसटी बस उपलब्ध झाली नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागत आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या शेवटच्या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी होणार हे अपेक्षित असतानाही एसटी प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, वीकेंडच्या काळात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था किंवा बॅकअप प्लॅन तयार ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विनाथांबा बससेवेचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी अतिरिक्त गाड्याच उपलब्ध नसल्याने ही सेवा केवळ नावापुरतीच असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, जलवाहतूक हाऊसफुल्ल आणि एसटी बसची प्रतीक्षा अशा दुहेरी परिस्थितीत प्रवाशांची कोंडी झाली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून देण्यात एसटी प्रशासन अपयशी ठरल्याने त्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.