रस्त्याचे काम सुरू, पण आपत्कालीन व्यवस्थेचे काय? वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेमुळे चिमुरड्याचा मृत्यू!


बेलकडे-अलिबाग मार्गावरील कोंडीचा गंभीर फटका; फुगा गिळलेल्या अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या आरांशचा दुर्दैवी अंत, रस्त्याच्या कामांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

अलिबाग (अमूलकुमार जैन): विकासकामे सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची आणि आपत्कालीन सेवांची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न अलिबाग तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेमुळे उपस्थित झाला आहे. बामणगाव येथील अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या आरांश सुशील ठाकूर या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेळताना फुगा गिळल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले जात असताना बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण झाला. रुग्णवाहिका कोंडीत अडकल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. अखेर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या चिमुरड्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरांश याने खेळताना फुगा गिळला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेण्याची धावपळ केली. रुग्णवाहिकेतून त्याला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिणामी रुग्णवाहिकेलाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे कठीण झाले.
दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पोहोचली. मात्र, तोपर्यंत आरांशचा मृत्यू झाला होता. अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या चिमुरड्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बामणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेने अलिबागमधील रस्त्यांच्या कामांच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विकासकामे ही नागरिकांच्या सोयीसाठी केली जातात; मात्र हीच कामे सुरू असताना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना तातडीने मार्ग मिळणार की नाही, याचाही विचार होणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्ग, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि आपत्कालीन वाहनांना प्राधान्याने मार्ग मोकळा करून देण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, रुग्णवाहिका ही केवळ एक वाहन नसून अनेकदा रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो. अशा वेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग मिळत नसेल, तर रस्त्यांच्या कामांच्या नियोजनाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
आरांशच्या मृत्यूमागे वाहतूक कोंडीमुळे झालेल्या विलंबाची नेमकी भूमिका काय होती, याची वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच बेलकडे-अलिबाग मार्गावरील कामाच्या ठिकाणी आपत्कालीन वाहतुकीसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याचीही माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी.
रस्ते विकासासाठी असतात; मात्र त्या विकासकामांदरम्यान आपत्कालीन सेवांचा मार्ग बंद होता कामा नये. आरांशच्या दुर्दैवी मृत्यूने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.