अलिबाग (प्रतिनिधी) : सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी आज १७ मंगळवार, पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील ३८० कर्मचारीही सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्मचारी हे कार्यालयात न जाता बाहेर उभे राहून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र, २१ महिने उलटूनही शासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ – गट क, महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट ड कर्मचारी महासंघ इत्यादी संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या मागण्यांसाठी या संघटनांनी पाठपुरावा केलेला आहे. काळ्या फिती लावून कामकाज, धरणे आंदोलन आणि सामुदायिक रजा आंदोलन असे आंदोलन केले. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याने आता बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, संगणकीय व मॅन्युअल कामकाजाचा दुहेरी भार या समस्याही गंभीर आहेत. सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी प्रमुख मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील चारही संघटनेचे ३८० कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपावर आता राज्य शासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.








