नवी दिल्ली (प्रतिनिधी): “राजकारणात येण्याआधी मी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होतो. माझ्यासमोर उत्तम करिअरची संधी होती. मात्र, केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने मी ते करिअर सोडून राजकारणाची वाट निवडली,” असे स्पष्ट मत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “मी एका पक्षाचा संस्थापक सदस्य म्हणून काम सुरू केले. माझ्या तारुण्यातील तब्बल १५ वर्षे त्या पक्षासाठी दिली. प्रचंड मेहनत, संघर्ष आणि निष्ठेच्या जोरावर पक्ष उभा केला. अनेक अडचणींना तोंड देत, रक्त आटवून काम केले.”
मात्र, सध्याच्या परिस्थितीबाबत त्यांनी खंत व्यक्त करत सांगितले की, “ज्या पक्षासाठी आयुष्याचा महत्त्वाचा काळ दिला, तोच पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पक्षाची विचारसरणी, कार्यपद्धती आणि मूल्यांमध्ये झालेला बदल पाहून मनाला वेदना होतात.”
चड्डा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या नाराजीमागील नेमकी कारणे काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे पक्षांतर्गत घडामोडींवरही लक्ष केंद्रीत झाले आहे.






