रायगड जिल्ह्यात प्रथमच अश्व तपासणी मोहीम; पर्यटन सुरक्षेलाही मिळणार बळ


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात प्रथमच घोड्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला अश्व चालक, मालक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अलिबाग नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच अश्व चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरामध्ये घोड्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण सल्ला तसेच विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किनारपट्टी भागात पर्यटनासाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, “रायगड जिल्ह्यात असा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेण्यात आला आहे. घोड्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब आहे. या मोहिमेमुळे घोड्यांबरोबरच पर्यटकांच्याही सुरक्षिततेला बळ मिळेल.”
या उपक्रमामुळे अश्वपालकांमध्ये जनजागृती निर्माण होऊन भविष्यात अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पर्यटन आणि पशुसंवर्धन यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.