रायगड (प्रतिनिधी): जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेती क्षेत्र कमी होत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र उद्योगांच्या विकासाबरोबरच शेतीही टिकली पाहिजे, यासाठी शासन कटिबद्ध असून कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. जिल्ह्यातील लागवड क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे तसेच उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी बियाणे, खते, सिंचन सुविधा आणि कृषी यंत्रसामग्री शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
मंत्री गोगावले म्हणाले की, बदलत्या परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. फळबाग लागवड, सेंद्रिय शेती आणि जलसंधारण यासारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शासन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत कृषी विभागातील अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.





