अलिबाग (प्रतिनिधी): आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भातील पक्षाची भूमिका, निवडणूक नियोजन, संघटनात्मक बांधणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाची ताकद अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत विविध सूचना मांडल्या.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विकासकामे, जनसंपर्क आणि पक्षविस्तार यावर भर देत जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटनात्मक कार्यात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. तर अनिकेत तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींना आगामी निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
बैठकीमुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीच्या तयारीला अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.






