अलिबाग (प्रतिनिधी): दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा मिळावी, विविध रोजगार व उच्च शिक्षणाच्या संधींबाबत माहिती मिळावी या उद्देशाने अलिबाग-रेवदंडा बाह्यवळणावरील हॉटेल सन्मान येथे भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट, झिराड आणि उत्कर्ष फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, शिवसेना शहरप्रमुख विकास कर्णेकर, दिलेंद्र शिलधनकर, संतोष म्हात्रे, वैशाली भिडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्याची गरज व्यक्त केली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आयटी, सॉफ्टवेअर आणि डिजिटल कौशल्यांना मोठी मागणी असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना मोफत आयटी सॉफ्टवेअर प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. “अलिबागला आयटी कौशल्यांचे केंद्र म्हणून विकसित करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्याय, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे अलिबाग तालुक्यातील सातवे करिअर मार्गदर्शन शिबिर ठरले. फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २४ युवकांना विविध क्षेत्रांत नोकरीची संधी उपलब्ध करून देत त्यांना नियुक्तीपत्रे (अपॉइंटमेंट लेटर) देण्यात आली आहेत. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध मार्गदर्शन शिबिरांमध्ये सुमारे १,५०० ते १,७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ऑनलाइन माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांनी घरबसल्या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
अलिबाग तालुक्यातील कोणताही विद्यार्थी योग्य करिअर मार्गदर्शनापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






