अलिबाग (प्रतिनिधी): कोकण विभागातील विधान परिषदेच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोकणातील राजकीय वस्तुस्थिती मांडत ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याची माहिती दळवी यांनी दिली.
कोकणात शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधान परिषदेची ही जागा पक्षालाच मिळावी, असा आग्रह बैठकीत धरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद आणि जनाधार लक्षात घेता या जागेवर पक्षाचा नैसर्गिक हक्क असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
उद्याचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी किती उमेदवार अर्ज भरतात, याकडे लक्ष ठेवावे लागणार असल्याचे दळवी म्हणाले. त्यानंतर माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोण माघार घेतो, यावरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे चार जूनपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या मुलीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे सांगत त्यांनी पक्षशिस्तीवर भर दिला.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. विधान परिषद निवडणुकीचा आणि पालकमंत्रीपदाच्या प्रश्नाचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोकणातील जनतेच्या हितासाठी आणि शिवसेनेच्या राजकीय बळाच्या आधारे पक्षाची भूमिका ठाम असून शेवटपर्यंत कोकणातील जागेसाठी आग्रही राहणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
या विधानामुळे कोकणातील विधान परिषद निवडणुकीबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, येत्या काही दिवसांत महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Home ताज्या बातम्या चार जूनपर्यंत प्रतीक्षा; कोकणातील जागेवर शिवसेनेची आग्रही भूमिका कायम – महेंद्र दळवी






