रायगडमध्ये उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


अलिबाग (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि जिल्हा क्रीडा परिषद, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २५ मे ते १० जून या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश रायगड जिल्ह्यातील मुला-मुलींना विविध क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे, त्यांच्यात शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करणे आणि भावी गुणवंत खेळाडू घडविणे हा आहे.
शिबिरामध्ये अथलेटिक्स, कराटे, तायक्वांदो, योगा, लगोरी यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना या खेळांचे तांत्रिक ज्ञान, शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचे धडेही दिले जात आहेत.
या प्रशिक्षण शिबिरात आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित तपस्वी गोंधळी, क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील आणि प्रियांका गुंजाळ हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या अनुभवी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी विशेष उत्साह निर्माण झाला असून शिबिरातील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधींची माहिती मिळत असून त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळत आहे.