रायगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सुतारवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध नियुक्त्या आणि संघटनात्मक निर्णय यावेळी घेण्यात आले.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्यावर पेण विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते म्हसकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले.
प्रमोद म्हसकर यांच्या नियुक्तीमुळे पेण विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हसकर यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत पक्षवाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस पक्षाचे जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






