अलिबाग (प्रतिनिधी): श्री शिवराज्याभिषेक सोहळा 5 व 6 जूनदरम्यान किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर हजारो शिवभक्त दाखल होत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने नागरिकांना उष्माघात, चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर येणा-या शिवभक्तांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाने गडावर आणि पायथ्याशी विशेष वैद्यकीय पथके, 24×7 रुग्णवाहिका आणि मुबलक औषधसाठ्यासह सज्जता ठेवली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दिवस एकूण 13 विशेष वैद्यकीय पथके शिवभक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असणार आहेत.
रायगड व परिसरात आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके, गडावरील विविध पॉईंट्स आणि पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी परिसराजवळ तात्पुरती वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मुबलक औषधसाठारू उन्हाचा त्रास, थकवा, चक्कर येणे, पाय घसरून होणा-या किरकोळ दुखापती यावर औषधोपचार करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जीवनरक्षक औषधे व लस उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी गडाच्या पायथ्याशी व परिसरातील प्रमुख मार्गांवर 24 तास कार्यरत असणा-या रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. सोहळ्यादरम्यान निर्माण होणा-या कोणत्याही आरोग्याच्या समस्येवर त्वरित उपचारासाठी डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक कॅम्पच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेकासाठी किल्ले रायगडावर येणा-या प्रत्येक शिवभक्ताची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून तशी सज्जता आरोग्य विभागाने ठेवली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी येउन या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मनिषा सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहुलकर यांनी केले आहे.
या ठिकाणी असतील पथके:
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एकूण 13 विशेष वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येकी 1 वैद्यकीय अधिकारी, 1 समुदाय आरोग्य अधिकारी व एक आरोग्यसेवक यांचा समावेश आहे. ही पथके कोंझर पार्किंग (। व।।), वाय जंक्शन, चित्त दरवाजा, चित्त दरवाजा व महादरवाजा दोन्हीच्या मध्ये, महादरवाजा, वालसुरे पार्किंग, पाचाड धर्मशाळा, नाणे दरवाजा, शिवसृष्टी पार्किंग (पाचाड गाव), कवळीचा माळ, मदारी मेहतर ते महादरवाजाच्या मध्ये, प्राथमिक आरोग्य केेंद्र पाचाड ओपीडी व राखीव पथक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.





