रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 अंतर्गत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
या मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्र आज अधिकृतरीत्या मागे घेण्यात आले. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवार, 4 जूनपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
जुईली दळवी यांनी 30 मे रोजी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र आज त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची नोंद केली.
जुईली दळवी या शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या उमेदवारी माघारीमुळे आता या निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार उरले असून आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे.






