अलिबाग(प्रतिनिधी): राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी नियुक्त असलेल्या ज्या शिक्षकांचा पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे, अशा शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 28 जून रोजी टीईटी परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिक्षेच्या तयारीसंदर्भात तसेच सनियंत्रण समिती गठीत करण्यासंदर्भात बुधवारी ता.3 जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
राज्यातील शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी 28 जून रोजी ही परीक्षा होणार आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सदस्यांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक ऑचल दलाल, राजिप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे, राजिप शिक्षणाधिकारी (योजना) आशा गरूड, राजिप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असणार आहेत. बैठकीसाठी सदस्य पोलीस आयुक्त कार्यालयामधील अभिजीत अभंग, शिक्षणाधिकारी पनवेल महानगरपालिका रमेश चव्हाण, राजिप उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे, संतोष शेडगे, प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील 9 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून एकूण 5 हजार 468 शिक्षक ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर 1साठी 1 हजार 10 विद्यार्थी, पेपर 2साठी 1 हजार 915 शिक्षक तर दोन्ही पेपरसाठी 2 हजार 543 शिक्षक प्रविष्ठ आहेत. सर्वच परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भातही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी समिती सदस्यांना सूचना केल्या.
गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता:
जिल्हा कोषागारापासून ते केंद्रस्थळी परिक्षेचे साहित्य पोहोचेपर्यंत व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे.
वर्गखोल्या, केंद्राचे प्रवेशद्वार, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणार.
उमेदवारांच्या तपासणीकरीता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग इ. सुविधा.
परिक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्त.
परिरक्षक व केंद्रसंचालकांची नियुक्ती.






