रायगड (प्रतिनिधी): जीर्ण झालेल्या नागाव-पाल्हे पुलाच्या दुरुस्तीचा दिखावा समोर आला आहे. मोठा गाजावाजा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे सोंग घेतले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम या पुलाच्या दुरुस्तीबाबत पुर्णतः अपयशी ठरले आहे. पाल्हे पूलाचा कठडा रविवारी कोसळला. या घटनेने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा शेकाप स्टाईलने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला जाईल असा इशारा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
नागाव, रेवदंडा, अलिबागसह असंख्य गावांना जोडणारा नागाव – पाल्हे पुल हा फार जूना आहे. हा पुल दगडी बांधकामाचा असून अरुंद आहे. मागच्या वर्षी या पुलाचा काही भाग खचला होता. दगड निघाले होते. त्यामुळे हा पुल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याची भिती निर्माण झाली होती. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी लेखी आदेश दिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. जेएसडब्लूसह अन्य धनदांडग्यांची अवजड वाहने या रस्त्यावरून बिनधास्तपणे धावत आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेश असूनही त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पत्र देऊन पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. मागील वर्षापासून या पुलाच्या दुरुस्तीचा दिखावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. दुरुस्ती करण्याचे सोंग केले. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची दुरुस्ती दिसून आली नाही. त्यामुळे या पुलाचा दगडी भाग हळूहळू ढासळू लागला आहे. तालुक्यातील नागाव – पाल्हे पुलावरून रेवदंडा, नागाव, काशीद, मुरूड, अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यात पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ या मार्गावर अधिक आहे. तरीदेखील या पुलाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील याच महिन्यात पुल कोसळण्याचा धोका समोर आला आहे. रविवारी सकाळी पुलाचा कठडा कोसळला. त्यामुळे पुलदेखील कधीही कोसळण्याची भिती निर्माण झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडली. या घटनेने शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दुरुस्तीबाबत त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
————-
अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका
नागाव – पाल्हे या पुलाचा काही भाग ढासळला आहे. पुलाच्या बंधाऱ्याला भले मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे पूल पुर्णतः नादुरुस्त अवस्थेत आहे. या नादुरुस्त पुलामुळे मोठी हानी होण्याची भिती आहे. या जीर्ण पुलाबाबतची माहिती देऊन हा पुल कोसळल्यास अनेक गावांचे संपर्क तुटण्याची भिती आहे. या मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.




