
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर त्यांना नमतं घ्यावं लागलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे आणि देशभर उभारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा पहिला मोठा विजय असून, यामुळे सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावेळी त्यांनी “Beginning is the End” असा उल्लेख करत, ही केवळ सुरुवात असून पुढील काळात सरकारला आणखी कठोर राजकीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा दावा केला. जनतेच्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर वेळेत निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगत चव्हाण यांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, विरोधी पक्षांकडून हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून या घडामोडींवर अद्याप अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही.






