
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यात वाढत्या कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र डंपिंग ग्राऊंड उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अलिबाग शहरासह वरसोली, चेंढी, चेंढर, कुरूळ, आवास, पेझारी, पोयनाड, रेवदंडा, नागाव आदी ग्रामपंचायतींचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होत असून त्याच्या विल्हेवाटीसाठी तालुक्यात कोणतीही सक्षम व्यवस्था उपलब्ध नाही.
सध्या अलिबाग तालुक्यात डंपिंग ग्राऊंडसाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाटील यांनी निवेदनात असेही म्हटले आहे की, अलिबाग परिसरात मोठ्या प्रमाणात मॅंग्रोव्ह क्षेत्र आहे. शासनाच्या विद्यमान धोरणांमुळे मॅंग्रोव्ह क्षेत्रात कोणतेही काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने डंपिंग ग्राऊंडसाठी जागा निश्चित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, नवी मुंबई विमानतळासारख्या प्रकल्पांसाठी ज्या प्रकारे विशेष बाब म्हणून मॅंग्रोव्ह क्षेत्रात बदल करण्यात आले, त्याच धर्तीवर अलिबाग तालुक्याचाही विचार करून डंपिंग ग्राऊंडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात महसूल मंत्री, वन विभाग, संबंधित जिल्हा प्रशासन आणि अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने बोलावून अलिबाग तालुक्याच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंतीही माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी निवेदनातून केली आहे.




