पंढरीच्या वाटेवरील अविस्मरणीय अनुभव; योगेश राणे यांनी सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण केली आषाढी वारी


आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी निघणारी आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याची वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे, भक्तीचे आणि समतेचे जिवंत प्रतीक मानली जाते. यंदाची आषाढी वारी ७ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत पार पडली. अलिबाग येथील योगेश राणे यांनी सलग तिसऱ्या वर्षी ही वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. यंदा आळंदी परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना पुण्यापासून वारी सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार योगेश राणे यांनी पुणे ते पंढरपूर असा पायी प्रवास करत वारी पूर्ण केली.
योगेश राणे सांगतात, “पांडुरंगाची कृपा असेल तर वारी सहज पार पडते. वारीदरम्यान पाऊस, ऊन, वारा, चिखल अशा अनेक अडचणी येतात. शरीर थकते, पाय दुखतात; मात्र परमेश्वराची कृपा आणि हरिनामाचा आधार असल्यामुळे सर्व त्रास विसरून जातो. विशेष म्हणजे ८० ते ९० वर्षांचे वारकरी उत्साहाने चालताना दिसतात. त्यांना पाहिल्यावर स्वतःचा थकवा कुठल्याकुठे निघून जातो. दररोज २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करत वारी कधी पूर्ण होते, हेही कळत नाही.”
वारीतील दैनंदिन दिनक्रमही अत्यंत शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेतीन वाजता उठून स्नान करून तयार व्हावे लागते. सामान वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये आपले बोचके वेळेवर ठेवावे लागतात. सकाळी सहा वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गस्थ होते आणि त्यानंतर संपूर्ण दिंडी हरिनामाच्या गजरात पुढे सरकते.
वारीत चालताना प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेतली जाते. दिंडीची शिस्त अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनही दक्ष असते. बाहेरील गर्दीमुळे दिंडीला अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जाते. सकाळपासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांनी वातावरण भक्तिमय झालेले असते. दुपारी भोजनासाठी विसावा घेतल्यानंतर पुन्हा भजन, अभंग आणि हरिनामाच्या गजरात संध्याकाळपर्यंत पदयात्रा सुरू राहते.
संध्याकाळी मुक्कामस्थळी पोहोचल्यानंतर हरिपाठ, प्रवचन किंवा कीर्तन झाल्यानंतरच भोजन केले जाते. प्रत्येक दिंडीचा हा नित्यक्रम असतो. योगेश राणे हे पेण येथील महिला दिंडीसोबत चालत होते. या दिंडीत सुमारे ८५ महिला आणि २० ते २५ पुरुष सहभागी होते. वारीत सर्वजण एकमेकांना “माऊली” म्हणून संबोधतात. त्यामुळे कोणताही भेदभाव जाणवत नाही. एखाद्या वारकऱ्याची दिंडी चुकली, तरी दुसरी दिंडी त्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करते. याच दिंडीत आळंदी येथील एक मुलगी आणि तिचे वडील एका दिवसासाठी सहभागी झाले होते. त्या मुलीने सुमधुर आवाजात भजन सेवा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
वारीत भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनामाचा अखंड गजर सुरू असतो. संपूर्ण प्रवासात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळते. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत अशा अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे वारकरी एकमेकांच्या पायाला स्पर्श करून आदर व्यक्त करतात. त्यामुळे लाखो वारकरी एकत्र असतानाही धक्काबुक्की, गोंधळ किंवा वादाचे प्रकार क्वचितच दिसून येतात.
दररोज अनेक किलोमीटर चालूनही प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत असतो. फुगड्या, नृत्य, अभंग आणि हरिनामातून वारकरी आनंदोत्सव साजरा करतात. वारी ज्या गावात मुक्काम करते, तेथील ग्रामस्थ वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करतात. पाणी, वीज, निवारा आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात. स्थानिक नागरिकही वारकऱ्यांसोबत हरिनामात सहभागी होत भक्तीचा आनंद लुटतात.
“असं म्हणतात की, वारीच्या काळात पांडुरंग मंदिरात नसून वारकऱ्यांसोबत चालत असतो,” असे सांगताना योगेश राणे भावुक होतात. वारीत प्रत्येक वारकऱ्याला काही ना काही आध्यात्मिक अनुभव येतो. ज्येष्ठ वारकऱ्यांचे अनुभव, त्यांचे विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांतून खूप काही शिकायला मिळते.
योगेश राणे शेवटी म्हणतात, “वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही, तर ती संस्कार, शिस्त, समता, सेवा आणि भक्ती यांचा जीवनविद्येचा प्रवास आहे. आयुष्य अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जगायचे असेल, तर प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी पंढरपूरची वारी नक्की अनुभवावी.”