सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेत भरत गोगावले यांनी मानले आभार


मुंबई (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सुनेत्राताई पवार यांचे मनापासून आभार मानले.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गोगावले यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. रायगडच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा तसेच विविध विकास योजनांना प्राधान्य देत पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या माध्यमातून रायगडच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासनाला सोबत घेऊन समन्वयाने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सुनेत्राताई पवार यांच्यासोबत झालेल्या या भेटीत रायगडच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.