काँग्रेसच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्य नियुक्त्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मान्यता


अलिबाग (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी राबविण्यात आलेल्या संवर्धन-सुजन अभियानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरीय संघटनात्मक निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर तालुकास्तरावरही पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रायगड जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांनी सर्वानुमते सुचविलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना नुकतीच प्रदेश काँग्रेसकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नियुक्त्यांना मान्यता दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्हा व तालुकास्तरावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या नियुक्त्यांमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदासह विविध महत्त्वाच्या पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राणी साहेब यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची तसेच पक्षाची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राहणार आहे.

नियुक्तीपत्र प्रदानाचा हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी दुपारी ४ ते ४.३० वाजता सुरू होणार असून, साधारण दोन ते तीन तास हा कार्यक्रम चालणार आहे. अलिबाग येथील बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन अर्थात काँग्रेस भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.