नऊवारी साडी, नथ आणि हुला हूपचा अनोखा संगम; ‘द बॉम्बे हूपर’ शिवानी धोबावकरची प्रेरणादायी कहाणी


मुंबई (प्रतिनिधी): नऊवारी साडी, नाकात नथ, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि कंबरेभोवती सराईतपणे फिरणारी हुला हूपची रिंग… सध्या सोशल मीडियावर या अनोख्या अंदाजामुळे एक मराठी तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. तिचं नाव आहे शिवानी धोबावकर. मात्र, आज ती केवळ शिवानी म्हणून नव्हे, तर ‘द बॉम्बे हूपर’ म्हणून जगभरात ओळखली जाते.

शिवानीला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हुला हूपची रिंग भेट म्हणून मिळाली. तेव्हापासूनच तिची या खेळाशी मैत्री झाली. मात्र, भारतात हुला हूपचं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर शिवानीने या कलेचा सराव सुरू ठेवला.

पुढे तिने बीएससी आयटीचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका कंपनीत नऊ ते पाचची सुरक्षित नोकरी स्वीकारली. मात्र, कॉम्प्युटरच्या स्क्रीनपेक्षा तिचं मन हुला हूपच्या रिंगमध्ये अधिक रमायचं. मुंबईत आल्यानंतरही तिचा सराव सुरूच होता. रात्री उशिरापर्यंत, अगदी दोन वाजेपर्यंत ती यूट्यूबवर परदेशातील हुला हूप कलाकारांचे व्हिडिओ पाहायची आणि त्यातून नवनवीन प्रकार शिकून त्यांचा सराव करायची.

त्यानंतर आला लॉकडाऊनचा काळ. याच काळात शिवानीने आयुष्यातील सर्वात धाडसी निर्णय घेतला. सुरक्षित आयटीची नोकरी सोडून तिने हुला हूपलाच आपलं करिअर बनवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. अनेक डान्स अकॅडमींनी तिला क्लास घेण्यासाठी नकार दिला. ‘नुसत्या हुला हूपमधून काय करिअर होणार?’ असे टोमणेही तिला ऐकावे लागले. मात्र, शिवानीने हार मानली नाही. आईच्या संपर्कातून तिला पहिला विद्यार्थी मिळाला आणि त्यानंतर तिच्या प्रवासाने वेग घेतला.

आज पाडव्याची शोभायात्रा असो, गणपती आगमनाची मिरवणूक असो किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम—नऊवारी साडी आणि पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये हुला हूपचं भन्नाट फ्युजन सादर करणारी शिवानी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिच्या कौशल्याने लाखो तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ज्या हुला हूपकलेतून काहीही मिळणार नाही, असा टोमणा तिला कधी ऐकावा लागला होता, त्याच कलेच्या जोरावर आज शिवानीने स्वतःचं भक्कम करिअर उभं केलं आहे. हजारो विद्यार्थ्यांना हुला हूपचे प्रशिक्षण देण्याबरोबरच तिने मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत जाहिरातीत काम करण्याची संधीही तिला मिळाली आहे. तिच्या या प्रेरणादायी प्रवासावर आधारित स्वतंत्र रॅप साँगही तयार करण्यात आले आहे.

शिवानी धोबावकरची कहाणी केवळ हुला हूपपुरती मर्यादित नाही. सुरक्षित आणि पारंपरिक करिअरचा मार्ग सोडून स्वतःच्या आवडीला व्यवसायाचं रूप देण्याची तिची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. फॅशन, जिद्द, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर पारंपरिक साचे मोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते, हे शिवानीने आपल्या प्रवासातून दाखवून दिलं आहे.

‘द बॉम्बे हूपर’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवानी धोबावकरची ही कहाणी आज अनेक तरुणांना आपल्या आवडीचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा देत आहे.