गोकुळवाडा शाळेतील २९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


आनंदराव कचरे यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; धनगर समाज महासंघाचा स्तुत्य पुढाकार

खोपोली(दत्तात्रय शेडगे): शिक्षक दिनाचे औचित्य साधत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी तथा समाजसेवक आनंदराव कचरे यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील गोकुळवाडा जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील २९ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तरांसह विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
आनंदराव कचरे गेल्या अनेक वर्षांपासून ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा उद्देश ठेवून ते सातत्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता कचरे यांनी अनेक गरजू तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठीही मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या आनंदराव कचरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत जीवनाचा संघर्ष केला. रोजगाराच्या शोधात मुंबई गाठल्यानंतर नोकरी करत असतानाही त्यांनी समाजसेवेची कास सोडली नाही. स्वतःच्या संघर्षमय जीवनातून मिळालेल्या अनुभवामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
गोकुळवाडा येथील शाळेतही त्यांनी स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. यामध्ये दोन अनाथ विद्यार्थ्यांना विशेषतः दप्तरांचे वाटप करण्यात आले. धनगर समाजातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील एकही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, ग्रामस्थ अंकुश खरात, अमोल झोरे, रमेश खरात यांच्यासह ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी कचरे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.