ज्येष्ठ, गर्भवती महिला आणि बालकांचा त्रास टाळण्यासाठी ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन; मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळण्याचे समन्वय समितीच्या बैठकीत निर्देश
अलिबाग(प्रतिनिधी) : गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनीप्रदूषण टाळावे, इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळावा, अशा सूचना पोलिसांनी गणेश मंडळांना दिल्या. डीजे, स्पीकर आणि ध्वनिवर्धकांची निर्धारित मर्यादा पाळून मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील शांतता व मोहल्ला समिती, सार्वजनिक गणेश मंडळे, पोलीस पाटील तसेच डॉल्बी-डीजे चालक-मालक यांच्या समन्वय समितीची बैठक सोमवारी अलिबाग नगरपरिषदेच्या ‘महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी’ सभागृहात झाली. सायंकाळी ५ ते ६.१५ या वेळेत झालेल्या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाबाबत विविध सूचना करण्यात आल्या.
मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि बालकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटचा वापरही पूर्णपणे टाळण्यास सांगण्यात आले. डीजेच्या दणदणाटाऐवजी पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणुका काढून उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
दीड दिवस, गौरी-गणपती, अनंत चतुर्दशी आणि साखरचौथ विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीचा मार्ग आयत्या वेळी बदलू नये. पूर्वपरंपरेनुसार निश्चित मार्गानेच मिरवणूक न्यावी. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पुरेसे स्वयंसेवक नियुक्त करून एका बाजूचा रस्ता मोकळा ठेवावा, तसेच नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या लाइफगार्डना सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या किंवा इतरांच्या अंगावर जाऊन नाचणाऱ्या व्यक्तींना मिरवणुकीत सहभागी करून घेऊ नये. अशा व्यक्तींची माहिती आधीच पोलिसांना द्यावी, जेणेकरून अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल, असे सांगण्यात आले.
गणेश मंडळांनी देखाव्यांमधून नशामुक्तीचा संदेश द्यावा, मंडपात अग्निशामक यंत्रणा ठेवावी आणि विद्युत व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी. मंडप परिसरात जुगारासारखे प्रकार होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यास सांगण्यात आले. सायबर फसवणुकीसाठी १९३० आणि तातडीच्या पोलीस मदतीसाठी ११२ या हेल्पलाइनची जनजागृती करणारे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेशोत्सवापूर्वी अलिबाग शहरासह कुरूळ आणि वरसोली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या. उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणच्या अभियंत्यांनाही सूचना करण्यात आल्या.
बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो दुचाकी टाळावी आणि चारचाकी वाहने नियोजित ठिकाणी पार्क करावीत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५नुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला. गर्दीत सोनसाखळी चोरीची शक्यता असल्याने महिलांनी मौल्यवान दागिने परिधान करून बाजारपेठेत जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले.
सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन सिटीझन पोर्टलद्वारे परवानगीसाठी अर्ज करून संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घ्याव्यात. लावणी, नाटक, लोककला व मनोरंजन कार्यक्रमांसाठी आवश्यक वैध प्रमाणपत्रे घेऊन अश्लील सादरीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले.
अलिबाग शहरातील भटके कुत्रे व जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावर नगरपरिषदेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, पेण नालकुल, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दहातोंडे, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह प्रशासकीय व पोलीस अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, डॉल्बी-डीजे चालक-मालक तसेच शांतता व मोहल्ला समितीचे सदस्य उपस्थित होते. सुमारे ५० ते ६० नागरिकांच्या उपस्थितीत गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.









