११ ते २७ सप्टेंबरदरम्यान खासगी वाहनांसह एसटी बसेसनाही सवलत; विशेष पास-स्टिकर बंधनकारक
रायगड (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य शासनाने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध प्रमुख मार्गांवर टोलमाफी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मार्ग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्गांसह अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसनाही या टोलसवलतीचा लाभ मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष पास किंवा स्टिकर आवश्यक
टोलमाफीचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांच्या वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचा विशेष पास अथवा स्टिकर लावणे आवश्यक राहणार आहे. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद करावे लागणार आहे. गणेशभक्तांना हे पास पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौक्या तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे कोकणात जाण्यासाठी घेतलेला हा पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईसह इतर भागात परतणाऱ्या भाविकांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
एसटी बसेसनाही टोलमुक्त प्रवास
गौरी-गणपती उत्सवासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी देण्यात आली आहे. संबंधित बसेसना पोलिस अथवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत आवश्यक पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या एसटी बसेसचा प्रवासही टोलमुक्त होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर भागांतून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणातील विविध भागांत मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. या काळात महामार्गांवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने टोलमाफीसोबतच वाहतूक नियोजन, सुरक्षितता आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुकर आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे.









